आठवडा बाजार कुठे भरवायचा? मुख्याधिकाऱ्यांनी मागितला पोलीस स्टेशनकडे अभिप्राय
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२१ फेब्रुवारी - फलटण शहरातील महात्मा फुले चौक ते श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते शासकीय अधिकार गृह ते केंजळे स्मारक ते गिरवी नाका या परिसरामध्ये दर रविवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजार हा शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर मागील काही रविवार पासून भरविण्यात येत आहे, तसेच फलटण शहरातील मध्यवर्ती बाजार पेठ येथे भरविण्यात येणाऱ्या आठवडी बाजाराच्या ठिकाणी वाहतूकीची समस्या तसेच मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची दुकाने, घरे असल्यामुळे तसेच अरुंद रस्ते यामुळे आठवडा बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दीचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या समस्यांमुळे सोमवार दिनांक १७/०२/२०२५ रोजी काही शेतकरी, भाजीपाला विक्रेते यांनी फलटण नगरपालिकेमध्ये येऊन दर रविवारी भरविण्यात येत असलेला आठवडा बाजार हा पूर्वीप्रमाणेच भरत असलेल्या माळजाई मंदिर परिसरामध्ये भरविण्यात यावा अशी मागणी केली. सदर मागणी नुसार दर रविवारी भरविण्यात येत असलेला आठवडा बाजार हा शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ या ठिकाणी भरविण्यात यावा किंवा पूर्वीप्रमाणेच माळजाई मंदिर परिसरामध्ये भरविण्यात यावा किंवा कसे? याबाबत स्वयंस्पष्ट अभिप्राय कळविणेबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनला दिनांक १७/०२/२०२५ रोजीच नगरपालिकेकडून पत्र देण्यात आले आहे.
दिनांक २०/०२/२०२५ रोजी शहरातील सर्व व्यापारी मित्र संघटना, भाजीपाला संघटना, कापड व्यापारी संघटना, किराणा व्यापारी संघटना, फळविक्रेते संघटना यांनी संयुक्तपणे निवेदन देऊन दर रविवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजार हा शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ याठिकाणीच नियमितपणे प्रत्येक रविवारी भरविण्यात यावा, अशी मागणी केलेली आहे. सदर मागणी नुसार फलटण शहर पोलीस स्टेशनला स्वयंस्पष्ट अभिप्राय कळविणेबाबत पुन्हा एकदा पत्र देण्यात आले आहे.
माळजाई मंदिर परिसर हे शहरातील एक महत्वाचे ठिकाण असल्यामुळे सदर ठिकाणी आठवडी बाजार भरविणे उचित होईल किंवा कसे? तसेच मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची दुकाने, घरे असल्यामुळे तसेच अरुंद रस्ते यामुळे आठवडा बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या गर्दीचा प्रश्न तसेच वाहतुकीची समस्या, या सर्व बाबींचा सारासार विचार करता दर रविवारी भरविण्यात येत असलेल्या आठवडी बाजार हा शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ या ठिकाणी भरविण्यात यावा किंवा पूर्वीप्रमाणेच माळजाई मंदिर परिसरामध्ये भरविण्यात यावा किंवा कसे? याबाबत नगरपालिका प्रशासन व फलटण शहर पोलीस प्रशासन यांची लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असून सदर बैठकीमध्ये उपरोक्त सर्व नमूद मुद्यांच्या अनुषंगाने चर्चा करून फलटण शहराच्या दृष्टीने हिताचा निर्णय घेण्यात येईल असे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी प्रेसनोट द्वारे कळवले आहे.
No comments