मार्केट कमिटीची गाळा भाडेवाढ अन्यायकारक - ॲड. नरसिंग निकम
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१३- फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने, गाळेधारकांवर अन्यायकारक भाडेवाढ केली आहे. ६०० रुपये भाडे होते ते १२०० रुपये केले आणि त्याच्यावर १८% जीएसटी म्हणजे प्रत्येक गाळ्याला १४७५ रुपये भाडे होत आहे, ही केलेली भाडेवाढ कायद्यात बसत नाही आणि व्यवहारातही बसत नसल्याचे ॲड. नरसिंग निकम यांनी सांगितले.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे धारकांची भाडेवाढ संदर्भात मीटिंग झाली. यावेळी निकम बोलत होते. या प्रसंगी माजी नगरसेवक अशोक जाधव व मार्केट कमिटीचे गाळेधारक उपस्थित होते.
गेल्या सहा वर्षांपूर्वी याच गाळेधारकांनी आंदोलन केले होते आणि आंदोलनात ठरले होते की, भाडेवाढ करायची नाही. मार्केट कमिटीच्या गाळेधारकांना धंदा नाही, मार्केट कमिटी कोणत्याही सुविधा देत नाही, असे असताना केवळ भाडेवाढ करायची आणि गाळा धारकांकडून जास्त रक्कम वसूल करायची असा भ्रष्टाचारी कारभार मार्केट कमिटीत चालू आहे. ही भाडेवाढ आम्ही हाणून पाडणारच आहोत. त्याचबरोबर मार्केट कमिटीचा सन २०१३ सालापासून स्पेशल ऑडिट करावे असे मंत्री महोदयांना भेटून आम्ही सर्व गाळेधारक विनंती करणार आहोत प्रसंगी आम्ही याप्रकरणी हायकोर्टात देखील जाऊ असेही ॲड. नरसिंग निकम यांनी स्पष्ट केले.
No comments