राजाळे येथील प्रवेशाचा राष्ट्रवादीशी संबंध नाही - आ.सचिन पाटील
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ मार्च - ज्या पक्षाचे तिकीट माजी आमदारांनी नाकारले त्यांना असे पक्ष प्रवेश करून घेण्याचा अजिबात अधिकार नाही, आमदार रामराजे हे राष्ट्रवादी पक्षात असले तरी ते पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत त्यामुळे पक्षश्रेष्ठींना व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता, ते पक्ष प्रवेश कसे काय करून घेऊ शकतात असा प्रश्न आमदार सचिन पाटील यांनी केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट नाकारून राजे गटाने अजित पवारांचा मोठा अवमान केला आहे. आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या मदतीने राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणला आणि खऱ्या अर्थाने फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जीवंत ठेवली. आता रामराजे हे टेक्निकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. परंतु, विधान विधानसभेच्या निवडणुकीपासून त्यांनी राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावली नाही असा आरोप श्रीमांत शिवरूपराजे खर्डेकर यांनी श्रीमंत रामराजेंवर केला.
आमदार सचिन पाटील व श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर फलटण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते याप्रसंगी राहुल निंबाळकर उपस्थित होते.
आमदार सचिन पाटील पुढे म्हणाले, ज्यांना राज्यातले पहिले तिकीट जाहीर केल्यावर पक्षाच्या यशावर विश्वास नसल्यामुळे त्यांनी वेगळी भूमिका घेत, पक्षविरोधी काम केलं त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल प्रेम दाखवू नये. रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीत राजाळे येथे झालेल्या कार्यकत्यांच्या प्रवेशाचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही असे सांगतानाच आमचे नेते रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर वैयक्तिक पातळीवरची टीका टाळावी. आमच्या नेत्यावर केलेली टीका आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा आमदार सचिन पाटील यांनी दिला.
दिनांक २२ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट या पक्षाची सदस्य नोंदणी डीएड चौक, फलटण येथे करून घेतली जाणार असून, या सदस्य नोंदणी अभियानासाठी मंत्री मकरंद पाटील, खा.नितीनकाका पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे आ. सचिन पाटील यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे फलटण तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर म्हणाले, सन १९८० मध्ये फलटण पूर्व भागामध्ये कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे दादाराजे यांनी त्या भागामध्ये तीन जिनिंग फॅक्टरी काढल्या होत्या. गेल्या पंधरा वर्षांपूर्वी बोंड आळी सारखा रोग कापसावर आल्याने कापसाचे पीक भागातून नामशेष झाले. त्यामुळे कापसाच्या फॅक्टरी बंद पडल्या. तालुक्यात मुबलक दूध असतानाही फलटणचा दूध संघ का बंद पडला हे आधी रामराजे यांनी सांगावे तसेच तालुक्यातील श्रीराम कारखान्याच्या सभासदांनी करोडो रुपयांचे ठेवी दिल्या, तरीही तुम्ही कारखाना चालवायला का दिला. या दोन संस्थांचा खुलासा त्यांनी करावा आणि मगच आमच्या जिनिंग फॅक्टरी वरती बोलावे.
श्रीराम सहकारी साखर कारखान्यासाठी श्रीमंत मालोजीराजे, शिवाजीराजे, दादाराजे, स्व. हणमंतराव पवार आणि स्व. हणमंतराव पवार यांचे वडील यांनी आपापल्या पध्दतीने कष्ट घेतले आहे. जवाहरने जुन्या मशिनरी आणून सभासदांवर १०० कोटी कर्ज लागण्याचा प्रयत्न आहे. या खर्चा बद्दल व काढलेल्या कर्जाबद्दल शेतकरी सभासदांनी जाब विचारला पाहिजे. कारखाना पुढे जवाहरला चालवायला द्यायचा की शेतकऱ्यांनी चालवायचा हे शेतकरी सभासदच ठरवतील, म्हणून आम्ही पूर्ण ताकतीने कारखाना निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी सांगितले.
No comments