अखेर श्रीरामचा ताबा संचालक मंडळाकडे
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३१ मार्च - श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर राज्य शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली होती. या निर्णयाच्या विरोधात श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले होते. यामध्ये प्रशासकाची नियुक्ती रद्द करून, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा कारभार संचालक मंडळाने पहावा असे आदेश उच्च न्यायालयाने दि.२७ रोजी पारित केले होते. त्याचबरोबर २९ मार्च २०२५ रोजी प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे विभाग, पुणे यांनी देखील उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाचे तात्काळ पालन करावे व आपल्या ताब्यातील कारखान्याचे दप्तर तात्काळ संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात यावे असे प्रशासक यांना कळविण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दिनांक २९ रोजी सायंकाळी चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन भोसले व संचालक मंडळ श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर ताबा घेण्यासाठी केले मात्र प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती आंबेकर या प्रकृतीच्या कारणास्तव येऊ शकल्या नाहीत, त्यामुळे संचालक मंडळ दीड तास वाट बघून परत गेले. त्यानंतर दिनांक ३० मार्च रोजी 11:30 वाजण्याच्या दरम्यान प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती आंबेकर यांनी श्रीराम सहकारी साखर कारखाना स्थळावर येऊन, सील केलेले कुलूप काढून घेतले व दप्तर संचालक मंडळाच्या ताब्यात दिले. यावेळी चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन भोसले व संचालक मंडळ उपस्थित होते.
विरोधक आमच्यावर भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करतात, मात्र कारखान्यात भ्रष्टाचार करण्यासारखे काहीच नाही. सर्व व्यवहार पारदर्शी आहेत. मागील सात दिवस श्रीराम कारखानाचा चार्ज प्रशासक तथा प्रांताधिकारी यांच्याकडे होता, प्रशासक यांनी कारखान्याचे सर्व बँक खाते सुद्धा सील केलेले होते. त्यानंतर सर्व खात्यांची स्टेटमेंट ही प्रशासक म्हणून प्रांताधिकारी यांनी तपासले आहे. त्यामुळे श्रीरामच्या पारदर्शी आर्थिक व्यवहाराबाबत प्रांतांना सर्व गोष्टी ज्ञात झाल्या असल्याचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सांगतानाच, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे दप्तर पुन्हा संचालक मंडळाकडून आले, हा सत्याचा व संयमाचा विजय असल्याचे सांगितले.
No comments