दुसऱ्याच्या संस्थांवर बोलण्यापेक्षा स्वतःच्या संस्थांमध्ये काय चाललंय, याचा अभ्यास करा - मा. खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा श्रीमंत रामराजे यांना सल्ला
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) - शिक्षणाच्या आधारीत, तुमचा पराक्रम असता तर मागील 30 वर्षात तुम्ही बारामतीच्या पुढे नाही पण बारामतीच्या बरोबरीने फलटणचा विकास केला असता तरी आम्ही तुमच्या शिक्षणाचे महत्त्व मानले असते. तीस वर्षांपूर्वीचा एक लाख लिटरचा दूध संघ आज भंगारात जमा झालाय, जमिनी विकायला काढल्यात, संघ शून्य लिटर वर आणून ठेवलाय, श्रीराम सहकारी साखर कारखाना शोषण शोषून तो आवाडेंच्या ताब्यात दिला, मालोजी बँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध लादले, तुमच्याकडे असणारा खरेदी-विक्री संघ गायब आहे, बाजार समिती कर्मचाऱ्यांचा सहा महिने पगार नाही, तुम्ही दुसऱ्याच्या संस्थांवर बोलण्यापेक्षा स्वतःच्या संस्थांमध्ये काय चाललंय, याचा अभ्यास करा असा उपरोधिक सल्ला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला.
श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नियुक्त करण्याच्या मागणीला यश आल्यानंतर त्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, ॲड. नरसिंह निकम, हणमंतराव मोहिते, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, संतकृपा उद्योग समुहाचे विलासराव नलवडे, यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीराम कारखान्याचे वाटोळे होईल का चांगलं होईल, ते येणारा भविष्यकाळ ठरवेल, गेल्या 30 वर्षात तुम्ही श्रीराम कारखान्याचं काय केलं ते सर्वांना माहित आहे, वर्तमान काळातली तरुण पिढी फार बुद्धिमान आहे, मला खात्री आहे की सभासदांची मुलं, श्रीराम कारखाना चांगला चालवतील, मी श्रीराम कारखान्याच्या संचालक बॉडीवर जाणार नाही, श्रीराम कारखाना गोरगरीब सभासदांच्या मालकीचा आहे, आणि तो सभासदांच्या हितासाठी चालला पाहिजे, हेच माझे प्रयत्न आहेत. मी कधीही श्रीराम च्या हिताच्या आड आलेलो नाही आणि येणार नसल्याचे मा. खा. रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.
श्रीराम साखर कारखाना आणि जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना या सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग या संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येत असल्याचे १५ वर्षे सांगितले, २ सहकारी संस्थांच्या माध्यमातून तिसरी संस्था स्थापण्याचा आणि त्या माध्यमातून श्रीराम चालविण्याचा अभिनव उपक्रम असे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात या संस्थेच्या नावे गाळपाचा परवाना नाही, त्या संस्थेचे बँक खाते नाही, हिशेब नाही, ताळेबंद नाही, नफा तोटा पत्रक नाही मग या संस्थेच्या माध्यमातून झालेल्या नफ्याच्या पैशाचे काय किंवा तोटा झाला असेल तर का दाखविला नाही असा सवाल करीत सारेच गौड बंगाल असल्याचा आरोप ॲड. नरसिंह निकम यांनी यावेळी केला.
आता कल्लाप्पा आण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला हा कारखाना चालविण्यास देण्यात आला, पूर्वी प्रति टन १२० रुपये श्रीरामला मिळत असत आता प्रति हंगाम दीड कोटी म्हणजे साधारण प्रति टन ३० रुपये मिळतील असे सांगत म्हणजे अशा व्यवहारात नेहमी होणारी वाढ येथे १२० रुपयांवरुन ३० रुपयांपर्यंत कमी झाली हे न समजणारे गणित असल्याचे ॲड. नरसिंह निकम यांनी निदर्शनास आणून दिले.
आपण सनदी अधिकारी म्हणून प्रशासनात उत्तम काम केले, वखार महामंडळ, शेती महामंडळ या शासकीय संस्था अधिक फायद्यात चालवून दाखविल्या, प्रशासनात अन्य ठिकाणी उत्तम काम केले म्हणून शासनाने आपला गौरव केला, अनेक पुरस्कार दिले असताना उच्च शैक्षणिक गुणवत्ता, सर्वोच्च सत्ता स्थान लाभलेले, राजघराण्यातील हे सन्मानीय गृहस्थ आपल्या गावात येऊन आपल्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात हे दुर्दैवी असल्याचे विश्वासराव भोसले यांनी आ. श्रीमत रामराजे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
श्रीराम कारखाना मतदार यादी बाबत आपण घेतलेले आक्षेप कायद्याचा पूर्ण अभ्यास करुन घेतले असल्याने त्याबाबत आता प्रशासकाच्या माध्यमातून योग्य निर्णय होईल आणि मयत सभासदांच्या वारसांना मतदानाचा हक्क नक्की मिळेल असा विश्वास व्यक्त करताना वास्तविक सभासद अर्जावर नॉमिनी (वारसाचे) नाव नमूद असल्याने सभासद मयत झाल्यानंतर सदर नॉमिनी व्यक्तीस योग्य सूचना देऊन आवश्यक कागद पत्रांची पूर्तता करुन घेऊन सदर शेअर त्यांच्या नावावर ट्रान्स्फर करण्याची जबाबदारी कारखान्याने पार पाडली नसल्याने हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे विश्वासराव भोसले यांनी निदर्शनास आणून दिले.
आपल्या हातून श्रीरामची सत्ता काढून घेऊन या मंडळींना श्रीराम बंद पाडायचा आहे आणि श्रीराम बंद पडल्यावर यांना मुबलक ऊस हव्या त्या दरात उपलब्ध होईल हे भविष्य सांगण्यापेक्षा गेली २०/२२ वर्षे कारखान्याची अनिर्बंध सत्ता तुमच्याकडे आहे तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेजारच्या सोमेश्वर, माळेगाव कारखान्याइतका ऊस दर, त्यांच्या प्रमाणे शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक सेवा सुविधा का दिल्या नाही असा सवाल श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी उपस्थित केला.
न्यू फलटण शुगर बाबत त्यांनी आकसाने भूमिका घेऊन तो कारखाना बंद पाडल्याचा आरोप करीत वास्तविक जी बँक एन सी एल टी मध्ये गेली त्यांचे कर्ज केवळ १५ कोटी आणि 150 कोटीची मालमत्ता तारण असताना एन सी एल टी मध्ये जाण्याचे कारण नव्हते मात्र ते जाणीव पूर्वक घडवून आणल्याचा आरोप प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी केला.
श्रीराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत मा. खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर पॅनल उभा करणार असून, माजी खासदार प्रणित महायुतीचा झेंडा श्रीराम वर लावणार असल्याचे प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी सांगितले.
No comments