Breaking News

बाळशास्त्री जांभेकरांचे विस्मृतीत गेलेले कार्य रविंद्र बेडकिहाळ यांनी प्रदीर्घ परिश्रमातून पुढे आणले : डॉ. सदानंद मोरे

Ravindra Bedkihal brought forward the forgotten work of Balshastri Jambhekar through long hard work: Dr. Sadanand More

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ - ‘‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्राच्या समाजप्रबोधनातील अग्रदूत होते. राजा राममोहन रॉय यांनी स्त्री शिक्षण आणि स्त्रियांच्याबद्दलच्या हिंदू धर्मातील अनिष्ठ चालीरिती, रुढीपरंपरा या विरुद्ध उभारलेला लढा बाळशास्त्रींनी मुंबईत, महाराष्ट्रात अधिक ताकदीने पुढे नेला. शिक्षण, पत्रकारिता यासहीत अनेक क्षेत्रातील पुढाकार असलेले बाळशास्त्री जांभेकर जवळपास शे-सव्वाशे वर्षे विस्मृतीत गेले होते. परंतु रविंद्र बेडकिहाळ यांनी प्रदीर्घ परिश्रमातून बाळशास्त्री जांभेकर यांचे समग्र वाड्.मय तीन खंडातून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या माध्यमातून पुढे आणले आहे. त्याचीही नोंद महाराष्ट्राला घ्यावी लागेल’’, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी काढले.

    डॉ. सदानंद मोरे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद परिषद फलटण शाखा व महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी म.सा.प. फलटण शाखा अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी - बेडके, महात्मा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे, म.सा.प.शाखा कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे, ज्येष्ठ सदस्य प्रा. विक्रम आपटे, शाखा कार्यवाह अमर शेंडे, इतिहास अभ्यासक पोपटराव बर्गे, श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनिष निंबाळकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप, पत्रकार विकास शिंदे, रोहित वाकडे, निलेश सोनवलकर, अभिषेक सरगर,  आदींची उपस्थिती होती.

    ‘‘ब्रिटीश शासनात मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात रुजू होवून पहिले भारतीय प्रोफेसर होण्याचा मान बाळशास्त्री जांभेकरांनी मिळवला होता. देशातील राजकीय व्यवस्थेची पायाभरणी करणारे दादाभाई नौरोजी व सामाजिक सुधारणांची पायाभरणी करणारे दादोबा पांडुरंग हे बाळशास्त्रींचे शिष्य होते; यातून राजकीय आणि सामाजिक पायाभरणीतीलही जांभेकरांचे कार्य लक्षात येते. बाळशास्त्रींचे योगदान लक्षात घेता मुंबई विद्यापीठाला त्यांचे नाव देणे संयुक्तीक ठरु शकेल. तसा पाठपुरावा करावा’’, असेही डॉ. मोरे यांनी सूचित केले.

    यावेळी रविंद्र बेडकिहाळ यांनी फलटण शहरातील म.सा.प.शाखेच्या साहित्यिक उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. सचिन सूर्यवंशी - बेडके यांच्या हस्ते डॉ. सदानंद मोरे यांचे स्वागत करण्यात आले. महात्मा एज्युकेशन सोसायटी शिक्षण संकुलात डॉ. मोरे यांच्या हस्ते ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त पारंपारिक वेशभूषेत आलेल्या श्रीराम विद्याभवनच्या चिमुकल्या विद्यार्थीनींचे कौतुक डॉ. सदानंद मोरे यांनी आवर्जून केले.
 

No comments