श्रीराम अवसनायत जाणारा नाही तर वेगाने पुढे जाणारा कारखाना - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर- श्रीरामवर केलेले आरोप हे खोटे व बिनबुडाचे
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२३ मार्च - विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन श्रीराम कारखान्यावर अद्यापही कर्ज असल्याचे व अवसनायत जाणार असल्याचे वक्तव्य केले, ते सर्व आरोप खोटे व दिशाभूल करणारे आहेत, श्रीराम सहकारी साखर कारखाना सुस्थिती चालला असून तो अवसनायत काढण्याची सध्याची परिस्थिती नाही, जर कारखाना अवसनायत निघण्याची परिस्थिती असती तर आपल्याला शेतकऱ्यांना ऊसदर देता आला नसता, कारखाना कामगारांचे पगार वेळेवर होतात, प्रॉव्हिडंट फंड चा एक रुपया देखील देण्याचा राहिलेला नाही, ग्रॅच्युइटी वेळच्या वेळेस चालू आहे. त्यामुळे श्रीराम सहकारी साखर कारखाना हा अवसनायत जाणारा नाही तर वेगाने पुढे जाणारा कारखाना आहे. ज्याची गाळप क्षमता 5000 टन चालू सीजन ला झाली असून, पुढील एक-दोन वर्षात दहा हजार टन गाळप क्षमता होईल. त्याचबरोबर 90 हजाराची डिस्टिलरी त्या ठिकाणी तयार होईल, अशा दृष्टीने श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे कामकाज चालू असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, ॲड. नरसिंह निकम वगैरेंनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपाना उत्तर देण्यासाठी लक्ष्मी विलास पॅलेस या आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी युवराज ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन शाहुराज भोसले व संचालक मंडळ सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
श्रीराम सहकारी साखर कारखाना गेली १५/१६ वर्षे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना चालवित असून, श्रीराम संचालक मंडळाकडे कोणतेही आर्थिक अधिकार नसल्याने आर्थिक घोटाळे, गैरव्यवहार करण्याची संधी येथे नसल्याचे आरोप करणाऱ्यांनाही माहित आहे, मात्र खोटे आरोप करुन सभासदांची दिशाभूल करुन कारखाना संचालक मंडळ निवडणूक जिंकण्याचा त्यांचा डाव असल्याचे सांगताना श्रीरामचे सभासद सुज्ञ, अभ्यासू, जाणकार असल्याने त्यांचा हा डाव यशस्वी होणार नसल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
श्रीराम निष्कर्जी झाला तरी शेअर्सची किंमत पुरेशी नसल्याने (नक्त मूल्य) कोणतीही बँक अर्थसहाय्य करण्यास पुढे येत नसल्याने आर्थिक तरतुदी अभावी आम्ही संचालक मंडळ सदर कारखाना चालवू शकत नसल्याने साखर संचालक, सहकार खाते आणि मंत्री समितीच्या मान्यतेने त्यांच्या वस्तुस्थिती समजावून देवूनच श्रीराम कारखाना चालविण्यास द्यावा लागला मात्र सभासदाना एफआरपी प्रमाणे ऊस दर, कामगारांना नियमांप्रमाणे पगार, तोडणी वाहतूक दारांना संपूर्ण पैसे नियमाप्रमाणे मिळतील याची दक्षता घेतल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
गाळप क्षमता वाढ करताना जुनी मशिनरी वापरल्याचा आरोप हा असाच खोटा दिशाभूल करणारा असून प्रत्यक्षात प्रतिदिन २ अडीच हजार मे. टन. ऐवजी आता दररोज ४.५ ते ५ हजार मे. टन. गाळप झाले असून आगामी काळात ते दररोज १० हजार मे. टन होणार असल्याची खात्री देताना गाळप क्षमता वाढ करताना काही जुन्या मशिनरीचा विस्तार केला जातो, जसे की बॉयलर, टरबाइन,पाईपलाईन वगैरे आणि काही मशिनरी नवीनच वापरावी लागते, त्याप्रमाणे विस्तार करण्यात आल्याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
आगामी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आणि साखर संचालक यांनी तपासून मान्यता दिलेली असल्याने त्यामध्ये कसल्याही त्रुटी नाहीत, मात्र विरोधकांनी मयत वारस सभासद समावेश, शेअर्सची रक्कम पूर्ण असणे, जमीन नावावर असणारेच सभासद असावेत अशी मागणी केली आहे, त्याला आमचाही विरोध असण्याचे कारण नाही मात्र, आम्ही यापैकी कोणाचाही मतदानाचा हक्क डावलला नाही, त्या सर्वांचा मतदार यादीत समावेश केला असल्याचे स्पष्ट करताना आम्ही सन २००२ पासून नवीन सभासद करताना त्यांचे नावावर जमीन आणि त्यामध्ये ऊस आहे याची खात्री केली आहे, शेअर्स रक्कम ऊस बिलातून दरवर्षी टप्प्याटप्प्याने जमा होत असली तरी तो सभासद आहे आणि मयत वारस नियुक्त करण्यापूर्वी त्यांचे वारसांनी कळविल्याशिवाय कोणाच्या निधनाबाबत कारखान्याला माहिती असू शकत नाही, त्यामुळे ज्यांनी मृत्यूचा दाखला व वारसांची आवश्यक कागद पत्र देऊन वारस नोंदीचे अर्ज केले अशा सुमारे २१०० मयत सभासदांच्या वारस नोंदी केल्या आहेत, उर्वरित अंदाजे १ ते दीड हजार मयत वारस नोंदी कागद पत्र उपलब्ध होताच करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
माळेगाव, सोमेश्वर साखर कारखान्यांशी ऊस दराबाबत तुलना करताना आपण सर्वांना एकच दर देतो, माळेगाव कारखाना गेटकेन व सभासद यांना वेगळा दर देतात, त्यांची गाळप क्षमता मोठी असल्याने ते अधिक दर देतात पण श्रीरामने गेल्या काही वर्षात एफ आर पी पेक्षा अधिक दर आणि तो ही वेळेवर दिला आहे, यावर्षी गाळप हंगाम संपताच गाळपास आलेल्या संपूर्ण ऊसाचे पेमेंट, तोडणी वाहतूक पेमेंट पूर्ण केले असून कामगारांना नियमाप्रमाणे, वेळेवर समोर पगार दिला जात असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
श्रीराम सभासदांच्या मालकीचा असून यापुढेही सभासदांची मालकी कायम राहील त्यामध्ये कोठेही बाधा येणार नाही, करार संपल्यानंतर विस्तार वाढ केलेली संपूर्ण मशिनरी श्रीरामाच्या मालकीची असेल आणि कोणतेही कर्ज अथवा बोजा श्रीरामवर असणार नाही याची ग्वाही देत केवळ संचालक मंडळ निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी खोटे नाटे आरोप करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत, त्यामध्ये बिलकुल तथ्य नसल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग या संस्थेच्या नावे तत्कालीन गाळप हंगामात गाळप परवाना, साखर पोत्यावर त्या संस्थेचे नाव आणि ताळेबंद, नफा तोटा पत्रक सर्वकाही होते पण त्याबाबतही दिशाभूल करण्यासाठीच चुकीचे आरोप करण्यात आल्याचे तत्कालीन सर्व कागद पत्रे उपस्थित पत्रकारांना दाखवित आरोपात तथ्य नसल्याचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी स्पष्ट केले.
No comments