विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेनुसार करियर निश्चित करावे- डॉ. अरुण अडसूळ
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.15 - मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे आय. क़्यु .ए. सी., स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. अरुण अडसूळ (माजी सदस्य, एम पी एस सी तथा माजी कुलगुरू, एस पी पी यु ) यांनी असे प्रतिपादन केले की, विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्य वाढवावे. पुढे बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले की, "आयुष्यात काही मोठे साध्य करायचे असेल, तर कारणे देण्याचे टाळा. फक्त बाह्य देखावा नको, आतून जिद्द आणि इच्छाशक्ती हवी. जीवनाला अर्थ असला पाहिजे, विनोदबुद्धी जपा, गांभीर्याने जगा, चांगल्या संगतीत राहा आणि कुटुंबाला प्राधान्य द्या." त्यांनी स्पर्धा परीक्षांमधील संधी, योग्य अभ्यास पद्धती, वेळेचे नियोजन, लॉजिकल थीन्किग, प्रेझेन्टेशन स्कील यावर विशेष भर दिला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मोकळ्या मनाने उत्तरे दिली आणि स्पर्धा परीक्षांमधील यशासाठी सातत्य, मेहनत आणि योग्य रणनीतीची गरज स्पष्ट केली.
कार्यक्रमात पीएसआय पदावर कार्यरत असलेल्या कु. अंकिता जाधव आणि कु. पूजा कर्चे यांनी आपला अनुभव विद्यार्थ्यांसमोर उलगडला. त्यांनी सांगितले की, "स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेक अडचणी येतात, मात्र संयम, सातत्य आणि योग्य नियोजन यामुळे आपण त्या सहज पार करू शकतो. कधीही हार मानू नका, अपयश आले तरी त्यातून शिकत पुढे जा." त्यांनी अभ्यासाचे नियोजन, नोट्स तयार करण्याचे तंत्र, उत्तर लेखन कौशल्य आणि मुलाखतीसाठी लागणारी तयारी यावर विशेष मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी, बारामतीचे संचालक श्री. विजयराज चंदनकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य दिशा कशी निवडावी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, "स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी कठोर मेहनत आणि योग्य मार्गदर्शन हवे. योग्य अभ्यास साहित्य, नियोजन, सराव परीक्षा आणि सकारात्मक मानसिकता यामुळे यश मिळवणे शक्य आहे."
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि फलटण संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यानंतर प्रमुख मार्गदर्शक, उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एच. कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये स्पर्धा परीक्षांचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, योग्य दिशादर्शनाचे महत्त्व तसेच महाविद्यालयाच्या वतीने अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी शेंडे आणि कु. प्रज्ञा यादव यांनी केले. प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय कु. प्राची शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन किरण काळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. गिरीश पवार (स्पर्धा परीक्षा समन्वयक) आणि त्यांच्या टीमने उत्कृष्ट नियोजन केले. महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.
या मार्गदर्शन व्याख्यानाचा एकूण १९१ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. उपस्थित मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांमुळे आणि अनुभव सामायिक केल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासासाठी नवी दिशा मिळाली. आय. क़्यु .ए. सी. समन्वयक डॉ. टी.पी शिंदे यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील संधी, तयारीचे योग्य तंत्र आणि प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला. महाविद्यालयाने भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Post Comment
No comments