सुपर मार्केट गाळे भाडेवाढ नियमानुसारच ; चर्चेतुन आणि समन्वय बैठकीत भाडेवाढीचा निर्णय
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१३- फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने गरजु व्यवसायधारक यांना जीवनावश्यक व शेतीपुरक व्यवसाय करणेसाठी सुपर मार्केट गाळे भाडेतत्वावर दिलेले आहेत. मार्केट यार्ड फलटण येथे एकुण २४८ सुपर मार्केट गाळे आहेत. त्यापैकी एकुण १४८ गाळ्यांचे करारनामे संपलेले आहेत अथवा करार नाहीत. सदरील गाळ्यांना बाजार समितीने खालीलप्रमाणे वेळोवेळी भाडेवाढ केलेली आहे.
यामध्ये सन 1997 मध्ये पुढील गाळ्यास 300 रुपये व मागील गाळ्यास 200 रुपये भाडे करण्यात आले. त्यानंतर सन 2009 मध्ये पुढील गाळ्यास 600 रुपये व मागील गाळ्यास 400 रुपये भाडे करण्यात आले. त्यानंतर सन 2023 मध्ये पुढील गाळ्यास 1250 रुपये व मागील गाळ्यास 650 रुपये भाडे करण्यात आले.
सन २०१३-१४ ते २०१५-१६ या कालावधीतील लेखापरिक्षण अहवाल, मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांचेकडील निर्देशास अनुसरुन दिनांक ०१ नोव्हेंबर २०१७ पासुन सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा यांचेकडील भाडेनिश्चितीनुसार भाडेवाढ करणेचा निर्णय घेतला. तथापि गाळेधारकांनी केलेले उपोषण, आंदोलन तसेच याबाबत मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, फलटण यांनी केलेली मध्यस्थी विचारात घेवुन मा. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील भाडेवाढीबाबतच्या प्राप्त होणाऱ्या निर्देशास अधिन राहुन, भाडे वसुली योग्य तो जमा खर्च होणेच्या हेतुने सक्तीने वसुली न करण्याचा निर्णय घेतला होता.
सुधारित भाडेवाढ व वाढीव डिपॉझिटच्या अंमलबजावणीचे बाबतीत ज्या गाळधारकांचे करार संपुष्टात आलेले आहेत अथवा अद्याप ज्यांचे करारच नोंदविण्यात आलेले नाहीत त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरविलेल्या दराने सुधारित भाडेवाढ व वाढीव डिपॉझिट लागु करावे. परंतु ज्या गाळेधारकांचे करार अद्याप संपुष्टात आलेले नाहीत त्यांचे बाबतीत करारातील तरतुदीनुसार भाडेवाढ बाबत कार्यवाही करण्यात यावी तसेच पोटभाडेकरु बाबत बाजार समितीने कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी असे मा. पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे. पुढील गाळ्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरविलेल्या दरानुसार मासिक भाडे रक्कम रु.२८३३/- व मागील गाळ्यास मासिक भाडे रक्कम रु.१५३३/- (संकलित कर व GST वगळून) लागु करावे असे निर्देश पणन संचालनालय यांनी दिले होते.
असे असले तरीदेखील बाजार समिती संचालक मंडळ सार्वत्रिक निवडणुक झालेनंतर सुपर मार्केट गाळा भाडेवाढीबाबत बाजार समितीने संचालक मंडळ, गाळेधारक यांचेसोबत एकुण ३ समन्वय बैठक घेणेत आल्या. मार्केट रेट, गाळेधारकांचे व्यवसाय आणि भाडे कमी करावे ही गाळेधारकांची मागणी विचारात घेवुन, सदर समन्वय बैठकीमध्ये विचार विनिमयातुन, चर्चेतुन आणि सामंजस्याने भाडेवाढीबाबतचा निर्णय घेणेत आला. सदरील भाडेवाढ दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ पासुन प्रत्यक्षात लागु करण्यात आली. त्यास अनुसरुन पुढील गाळ्यास रु.६००/- वरुन रु.१२५०/- व मागील गाळ्यास रु.४००/- वरुन रु.६५०/- (GST व संकलित कर वगळून) इतके भाडे अंतिम करण्यात आले.
त्यानुसार भाडेवाढीनंतर खालीलप्रमाणे साधारणतः सुपर मार्केट गाळा भाडे वसुली झालेली आहे. भाडेवाढ लागु झाल्यानंतर बाजार समितीस साधारणतः एकुण रु.२४,००,०००/- इतके भाडे प्राप्त झाले आहे. तसेच भाडेवाढ लागु होणेपुर्वीचे एकुण भाडे रु.२,२५,०००/- इतके थकीत भाडे आहे.
फलटण तालुक्याचे कार्यक्षेत्रात एक लाख शेतकरी खातेधारक आहेत. हे सर्व शेतकरी कोणत्या ना कोणत्या सिझनमध्ये शेतमाल खरेदी विक्रीसाठी आणत असतात. बाजार समितीस शासनाचे कोणतेही अनुदान नाही. स्वतःचे उत्पन्नातुन दैनंदिन खर्च, सोयी सुविधा व कर्मचारी पगार करावे लागतात. बाजार समितीने वेळोवेळी सुपर मार्केट गाळा भाडेवाढ दर १० ते १२ वर्षांनी दुप्पट भाडेवाढ केलेली आहे. सद्याची भाडेवाढ ही समितीने १५ वर्षानंतर चर्चेतुन, सामंजस्याने आणि गाळेधारक यांचेसोबत समन्वय बैठक घेवुन, निर्णय घेवुन दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ पासुन लागू केलेली आहे.
या मार्च महिन्यात संचालक मंडळाची मासिक बैठक असुन सदर बैठकीमध्ये थकीत गाळेधारक आणि ज्या गाळेधारकांचे करार संपले आहेत अथवा करार नाहीत अशा गाळेधारकांचे बाबतीत सविस्तर विचार विनिमय करुन पुढील उचित कार्यवाही करणेचा निर्णय घेतला जाईल असे समितीचे व्हाईस चेअरमन श्री. भगवान दादासाहेब होळकर यांनी सांगीतले.
सदर पत्रकार परिषदेकडे प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधी, समितीचे संचालक श्री.टी.डी. शिंदे, श्री. समर जाधव, श्री. शरद लोखंडे, श्री. अक्षय गायकवाड, श्री. संतोष जगताप व श्री. निलेश कापसे तसेच समितीचे सचिव श्री. शंकरराव सोनवलकर उपस्थित होते.
No comments