Breaking News

विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगात, शिक्षकांच्या ज्ञानाचा प्रकाश उपयुक्त ठरेल - प्राचार्य डॉ. पी. एच.कदम

The light of teachers' knowledge will be useful for students in the outside world - Principal Dr. P. H. Kadam

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ मार्च -आपण या महाविद्यालयात प्रवेश घेतला कोणाचे तीन वर्ष तर कोणाचे पाच वर्षाचे या महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाले, या कालावधीत तुम्हाला, आम्ही आमच्या कुवतीनुसार मार्गदर्शन केले आहे, आता आपण पदवी घेऊन बाहेर पडणार आहात, त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या प्रगतीला, आता सुरुवात होत आहे. बाहेरच्या जगात तुम्हाला चांगला रस्ता शोधताना, शिक्षकांच्या ज्ञानाचा प्रकाश नक्कीच उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच कदम यांनी केले महाविद्यालयांमध्ये आयोजित बीए तृतीय वर्षाच्या शुभेच्छा समारंभात ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. याप्रसंगी मंचावर डॉ. टी.पी शिंदे, डॉ. पी आर पवार डॉ. एन सी धवडे, डॉ. एस ए माने डॉ. एन के रासकर, डॉ. एस टी कदम, डॉ. ए एस जाधव प्रा.जी आर पवार हे विभाग प्रमुख म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे संयोजक म्हणून डॉ.ए एन शिंदे उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सुरुवातीस फलटण संस्थांचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य कदम पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हा कमी अधिक असला तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञानदान व पूरक ज्ञान देण्यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन केले. त्यामधून विद्यार्थी व शिक्षकांचे नाते घट्ट झाले, अशा परस्परपूरक शैक्षणिक वातावरणामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळते. आज शिक्षण घेतल्यानंतर काय करायचे असा प्रश्न घेऊन कितीही अंधारमय वातावरण झाले तरी शिक्षकांनी मात्र आशावादी प्रकाश दाखवायचा असतो आणि तो आमच्या शिक्षकांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता पदवीनंतर पुढे काही  ना काही व्यवसायिक कोर्सेस करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाल्य आणि पालक यांच्यात सुसंवाद असणे अतिशय महत्त्वाचे असते, पदवी निकालानंतर पालकांना विश्वासात घेऊन, तुम्ही पुढे काय करणार हे सांगणे गरजेचे आहे. आता तुम्ही सुज्ञ झालेला आहात त्यामुळे पालकांना पुढील शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे, तरच तुमच्या आत्तापर्यंतच्या शिक्षणाचा उपयोग होईल. आपणा सर्वांना भावी आयुष्य प्रगतीचे ठरावे या शुभेच्छा.

    प्रारंभी या कार्यक्रमात विविध उपक्रमात प्राविण्य मिळवलेल्या गुणवान विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. त्यावेळी काही निवडक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली, त्यामध्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विविध घटकांनी त्यांच्या शिक्षण प्रक्रियेत कशाप्रकारे मदत केली, उत्साह वाढवला, याबद्दल सांगितले व भविष्यात आम्ही महाविद्यालयाचे नाव उज्वल करू असा आशावादही व्यक्त केला. यामध्ये स्नेहलता बीचुकले, ऐश्वर्या कदम , साक्षी घनवट या विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या उपक्रमांच्या माध्यमातून आमचा व्यक्तिमत्व विकास झाल्याचे सांगितले.

    तदनंतर डॉ. एस सी जगताप डॉ, राहुल चौरे, डॉ.पी आर पवार, डॉ.एस.टी कदम, डॉ. ए के शिंदे, प्रा.प्रकाश शिंदे या प्राध्यापकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल  त्यांचा सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जगताप मॅडम व शेख सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.माने मॅडम यांनी केले. याप्रसंगी उपस्थित असणारे पत्रकार मुगूटराव कदम यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments