Breaking News

ज्येष्ठ पत्रकारांना मासिक २० हजार सन्मान निधी मिळण्याचा मार्ग झाला सुलभ ; रविंद्र बेडकिहाळ यांनी शासनाचे मानले आभार

 

The way for senior journalists to get 20 thousand monthly honor fund became easy; Ravindra Bedkihal thanked the government

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ५ -  आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना यापूर्वीच जाहीर करण्यात आलेले मासिक २० हजार अर्थसहाय्य मिळण्याचा मार्ग सुलभ केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व ना. एकनाथ शिंदे यांना राज्यातील पत्रकारांच्यावतीने महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी विशेष धन्यवाद दिले आहेत.

    याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात रविंद्र बेडकिहाळ यांनी नमूद केले आहे की, ‘‘राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत दिले जाणार्‍या रुपये ११ हजाराच्या अर्थसहाय्यात वाढ करुन ते रुपये २० हजार करण्याचा शासन निर्णय गतवर्षी दि. १४ मार्च २०२४ रोजी झाला होता. मात्र हे अधिकचे अर्थसहाय्य ज्येष्ठ पत्रकारांना अद्याप दिले जात नव्हते. याबाबत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने वारंवार शासनाचे लक्ष वेधले होते. ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाने पत्रकारांच्या कल्याणार्थ स्थापन केलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या स्थायी निधीमध्ये वाढ होणे आवश्यक असल्याचेही आम्ही शासनास निदर्शनास आणून दिले होते. आमच्या या मागणीनुसार आता ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने

    शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या ठेव रक्कमेत ५० कोटीची वाढ करुन या निधीची एकूण ठेव रक्कम आता १०० कोटी केली आहे. या मुदत ठेव स्वरुपात गुंतवण्यात आलेल्या निधीच्या व्याजातून आता ज्येष्ठ पत्रकारांना मासिक २० हजार आर्थिक सहाय्य मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. या दोन्ही निर्णयाबाबतचे स्वतंत्र शासन निर्णय काल शासनाकडून निर्गमीत करण्यात आले आहेत’’, असेही बेडकिहाळ यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

    दरम्यान, ‘‘सदर ज्येष्ठ पत्रकार सन्माननिधीतील ही रु. ९ हजार ची वाढ देताना ती याबाबतचा शासन निर्णय झाल्यापासून म्हणजेच दि. १४ मार्च २०२४ पासूनच्या फरकासह येत्या दि. ०१ एप्रिल पासून देण्यात यावी, अशी मागणी आम्ही यापूर्वीच शासनाकडे केली आहे. या मागणीचा शासनाने सकारात्मक विचार करावा’’, असेही आवाहन रविंद्र बेडकिहाळ यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

No comments