Breaking News

फलटणची आजची राष्ट्रवादी ही भाजपाची 'बी' टीम ; श्रीराम मध्ये जुनी मशनरी हा शिवरूपराजेंनी लावलेला जावई शोध - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

Today's Nationalist Party of Phaltan is BJP's 'B' team; Old machinery in Shriram is a son-in-law invention of Shivrupraje - Shrimant Sanjeevraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ मार्च - फलटण मध्ये कार्यरत असणारी आजची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्या कार्यक्रमाला तसेच भाजप पक्षप्रवेशाला उपस्थित असते, म्हणजे आजची राष्ट्रवादी ही भाजपाची 'बी' टीम आहे का? असा सवाल करून आज श्रीराम सहकारी साखर कारखाना ५००० क्षमतेने गाळप करतोय. त्यासाठी झालेला ८३ कोटी रुपये खर्च हा श्रीराम जवाहरने केला आहे. ज्यावेळी आपण गाळप क्षमता वाढवत असतो, त्यावेळी विविध मशनरी वाढवावी लागते,  जुने असलेले बॉयलर अपग्रेड करावे लागतात, टरबाईन्स अपग्रेड करावे लागतात आणि आतील जी पाईपलाईन असते ती नवीन टाकण्याशिवाय पर्याय नसतो,  त्या ठिकाणी फक्त लोखंडी सांगाड्याचा वापर करता येऊ शकतो, जुनी मशनरी टाकून गाळप क्षमता वाढवून कारखाना पंधरा-वीस वर्ष चालवायचा असे होऊ शकत नाही, मात्र शिवरूपराजे यांनी श्रीरामची मशनरी जुनी असल्याचा जावई शोध लावला असल्याचा टोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी लगावला.

    आमदार सचिन पाटील आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी श्रीराम सहकारी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे उपस्थित होते.

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने पासून रामराजे साहेब राष्ट्रवादी पक्षात आहेत व राष्ट्रवादी पक्षाचे काम करत आहेत, सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याच्या व राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून रामराजेंचे फार मोठे योगदान आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून ज्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुका मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आपणाला पाहायला मिळते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच विकासाची कामे देखील झाली आहेत, दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शकले झाली, त्यानंतर देखील रामराजे साहेब अजितदादा पवार यांच्यासोबत राहिले व आणि आजही त्यांच्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मिटींगला रामराजे यांची उपस्थिती असते, आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसवर कोण फार प्रेम दाखवतोय याची चढाओढ लागली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर, 1999 सालच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कै.लक्ष्मणतात्या पाटील यांच्या विरोधात कै. दादाराजे खर्डेकर हे राष्ट्रीय काँग्रेस कडून उभे होते आणि शिवरूपराजे देखील वडिलांसोबत होते आणि आज शिवरूपराजे राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल प्रेम दाखवत आहेत, फलटण मध्ये कार्यरत असणारी आजची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्या कार्यक्रमाला तसेच भाजप पक्षप्रवेशाला उपस्थित असतात, म्हणजे आजची राष्ट्रवादी ही भाजपाची 'बी' टीम आहे का? असा सवाल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित केला.

    श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९५७ मध्ये श्रीराम कारखाना सुरू झाला. पुढे शिवाजीराजे यांनीही तो चांगल्या प्रकारे चालवला. त्यानंतर पुढील काळात श्रीराम कारखाना अडचणीत आल्यानंतर, श्रीराम सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा रहावा म्हणून, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारखाना सुरू करण्यासाठी सर्व सभासद कार्यकर्ते तालुक्यातील सामान्य जनतेने सुद्धा ठेवी दिल्या. मात्र शिवरूपराजे आणि विरोधकांनी एक रुपयाही ठेव दिली नाही. श्रीराम सहकारी साखर कारखाना अडचणीत असतानाही अवसायनात न घालवता, तो सभासदांच्या मालकीचा रहावा म्हणून, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जवाहरला भागीदारी तत्वावर चालवायला दिला. तो चालवीत असताना अनंत अडचणी आल्या. मात्र, त्या अडचणी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक तसेच सभासदांना विश्वासात घेऊन सोडवल्या. आज श्रीरामला कर्जमुक्त केले आहे. आज श्रीराम कारखाना कामगार असतील किंवा ऊस उत्पादक यांना वेळेवर पैसे देत आहे. सध्या श्रीराम कारखाना ५००० गाळप क्षमतेने सुरू असून, सध्या त्याचे एक्सपान्शन सुरू आहे.  सतराशे- अठराशे गाळप क्षमता असलेला कारखाना आज ५००० क्षमतेने गाळप करतोय. त्यासाठी जवाहरने ८३ कोटी रुपये खर्च करून मशनरी टाकली आहे.   अजून पंचवीस ते तीस कोटी रुपये टाकल्यानंतर कारखान्याची गाळप क्षमता दहा हजारापर्यंत वाढणार आहे. एवढ्या कमी खर्चात कोणीही दहा हजाराची गाळप क्षमता वाढवून दाखवावी, असे आव्हानही श्रीमंत संजीवराजे यांनी विरोधकांना दिले.

    कापसाचे क्षेत्र कमी झाले म्हणून मिल बंद केल्या, असे शिवरूपराजे खर्डेकर सांगत आहेत, मग त्या मिलची जमीन किती होती. आत्ता ती किती आहे, व किती विकली, कोणी विकली व त्याचे पैसे कोणी घेतले, याचाही हिशोब त्यांनी द्यावा, अशी मागणी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

    राजाळे तालुका फलटण येथे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र विरोधकांनी दीपक चव्हाण व या प्रवेशावर आक्षेप घेतला आहे, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आमदार सचिन पाटील हे भाजपमध्ये कार्यरत होते, त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तिकीट दिल्यानंतर, ते निवडून आले, परंतु निवडून आल्यानंतर आमदार सचिन पाटील हे भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असतात, महायुतीच्या कार्यक्रम असेल तरी ना.अजितदादा पवार यांचा फोटो देखील कार्यक्रमात दिसत नाहीत, विद्यमान आमदार हे भाजपचे काम करत असतात, त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट हा फलटण तालुक्यात अडचणीत येत असल्याचे सांगतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसला या अडचणीतून दूर करण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे सक्षम असल्याचे स्पष्ट मत डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी व्यक्त केले.

No comments