ट्रान्सफॉर्मर व मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक ; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३ - सासवड, हिंगणगाव, तरडगाव, पिंपरे बुद्रुक, टाकुबाईचीवाडी, निंबोडी, काळज व रावडी बुद्रुक येथील विजेचा ट्रान्सफॉर्मर व मोटारसायकल चोरणाऱ्या दोन चोरट्यास लोणंद पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची तार व चार मोटारसायकली असा एकूण ३ लाख ११ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत विजेचे ट्रान्सफॉर्मर चोरीचे सत्र सुरू झाले होते. त्या अनुषंगाने सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चोरीतील संशयितांना पकडण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण व
अंमलदार यांचे एक पथक तयार केले. त्यामध्ये लोणंद एमएससीबीचे वायरमन यांच्या सहभागासह रात्रगस्त वाढवली होती. दरम्यान, माहितीगार सूत्रांकडून या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात संज्या नमण्या पवार (वय ५२) व आदित्य संज्या पवार (वय २०) (दोघे रा. झणझणे सासवड, माळीबेंद, ता. फलटण) हे व त्यांचे अन्य साथीदार आहेत. संशयित चोरटे हे घरी असल्याची माहिती पथकाला मिळताच त्यांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे प्राथमिक तपास केला असता संज्या पवार व आदित्य पवार, तसेच त्यांचे साथीदारांनी विजेचे ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील तांब्याची तार चोरली आहे.
या दोघांना अटक केल्यावर संज्या पवार याने त्याच्या वाटणीला आलेली तांब्याची तार, तसेच चोरी केलेल्या चार मोटारसायकली असा एकूण ३ लाख ११ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. तो पोलिसांनी जप्त केला आहे. संज्या पवार व आदित्य पवार यांनी सासवड, हिंगणगाव, तरडगाव, पिंपरे बुद्रुक, टाकुबाईचीवाडी, निंबोडी, काळज, रावडी आदी गावांतील विजेचे ट्रान्सफॉर्मर चोरल्याची कबुलीही पोलिसांकडे दिली आहे. त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी लोणंद, तसेच फलटण परिसरात ट्रान्सफॉर्मरची चोरी केल्याची कबुलीही दिली आहे.
No comments