मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी सहकार्य करणार -विधान परिषदेचे सभापती राम शिंदे
सातारा दि.16 - श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास दैदीप्यमान असा आहे. मुरूम येथील त्यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली.
जिल्हा परिषद सातारा व ग्रामपंचायत मुरूम यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची 332 वी जयंती मुरूम तालुका फलटण येथे साजरी करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे सभापती श्री शिंदे बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन पाटील, आमदार उत्तमराव जानकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार रामहरी रूपवनकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद आदी उपस्थित होते.
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी 30 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार लवकरच कामाला सुरुवात होईल, असे सांगून विधान परिषदेचे सभापती श्री. शिंदे म्हणाले, मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाबरोबर येथे मल्हारसृष्टी उभारण्यासाठी ही प्रयत्न केला जाईल. यासाठी जमीन कमी पडत असल्यास तीही उपलब्ध करून देणे विषयी सांगण्यात येईल. हे जन्मस्थळ युवा पिढीसाठी ऊर्जा व प्रेरणास्त्रोत ठरेल अशा पद्धतीने काम केले जाईल.
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी दिला जाणार ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे
वीर पुरुषांचे कार्य युवा पिढी समोर येणे महत्त्वाचे आहे. यासाठी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाकडून पाच कोटींचा निधी तातडीने दिला जाईल, अशी घोषणा ग्रामविकास व पंचायराज मंत्री श्री. गोरे यांनी कार्यक्रमाप्रसंगी केली. ते पुढे म्हणाले, मुरूम गावचा तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव तातडीने सादर करावा याला ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल. या माध्यमातून मुरूम व परिसराचा चांगला विकास केला जाईल. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देशातील मंदिरांबरोबरच संस्कृतीचेही जतन केले असल्याचेही मंत्री श्री गोरे यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी आमदार फंडातून भरीव निधी दिला जाईल, असे आमदार श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंती कार्यक्रमास स्वरूपराजे खर्डेकर, धैर्यशील कदम, माणिकराव सोनवलकर, लक्ष्मण हाके यांच्यासह मुरूम इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments