खंडणी प्रकरणातील महिलेला २४ मार्च पर्यंत पोलीस कोठडी
सातारा दि २२ (प्रतिनिधी) - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागितलेल्या खंडणी प्रकरणात संबंधित संशयित महिलेला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या महिलेला सातारा जिल्हा न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने 1 कोटीची खंडणी स्वीकारताना या महिलेला अटक केली होती.
पोलिसांनी कोठडी मागताना मांडलेले तीन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. यापैकी पहिला मुद्दा ठरला, तो या अटक करण्यात आलेल्या माहिलेसोबत इतर कोणी आहे का? याचा तपास करायचा असल्याचं सांगण्यात आलं. सहभागी व्यक्तींचा शोध सुरु असल्याने या महिलेची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तीवाद पोलिसांकडून करण्यात आला. या प्रकरणात आणखी कोण सामील आहे, याचा तपास करायचा आहे, असं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं.
पोलिसांनी आपला दुसरा मुद्दा मांडताना आवाजाची पडताळणी करायची असल्याचं सांगितलं. संबंधित महिलेच्या आवाजाचे नमुने तज्ज्ञांकडून घेऊन तपासायचे असल्याने पोलीस कोठडीची गरज असल्याचं न्यायालयास सांगण्यात आलं. तसेच तिसरं कारण सांगताना पोलिसांनी, महिलेच्या सह्यांचे नमुने एक्सपर्टकडून तपासायचे असल्याने पोलीस कोठडीची गरज असल्याचं नमूद करण्यात आलं. ही मागणी मंजूर करत आरोपी महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मात्र संशयित महिला आरोपीचे वकील नितीन गोडसे यांनी महिलेवर केलेले आरोप फेटाळले आहेत. जाणूनबुजून या महिलेला अडकवण्यासाठी हे सगळं केलं गेले आहे. या महिलेचे आधीचे वकील यांनीच या महिलेला फसवले आहे आणि या महिलेने कुठेही पैशांना हात लावलेला नाही, असं नितीन गोडसे म्हणाले.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेनं खंडणीचं हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर एक कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना तिला अटक केली. ही महिला एक कोटी रुपयांची मोजदाद करताना समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक कोटी रूपये घेताना या महिलेला रक्कमेसहीत रंगे हात अटक करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणात शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात संबंधित महिलेसह अनिल सुभेदार यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. दहिवडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, अनिल सुभेदार यांना दहिवडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील तपास कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments