मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी अटक
सातारा दिनांक 21 (प्रतिनिधी ) - ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या सातारा शहरातील महिलेला खंडणी प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी सकाळी कॅम्प सदर बझार मध्ये वकिलाच्या कार्यालयात एक कोटी रुपयांच्या रोख रकमेसह सदर महिलेला अटक करण्यात आली आहे. चारुशीला मोहिते (वय ४२ रा सत्वशीलनगर सातारा ) असे सदर महिलेचे नाव आहे. सातारा शहर पोलिसांकडून या महिलेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांना एका प्रकरणा संदर्भात ३ कोटी रुपयांची मागणी या महिलेने मध्यस्था मार्फत केली होती. अन्यथा राजभवनासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या खंडणीचा पहिला भाग रोख स्वरूपात मिळावा, असा लकडा या महिलेने मध्यस्थाकडे लावला, या खंडणी प्रकरणाची तक्रार विराज शिंदे यांनी, सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या पथकाने सापळा रचून, कॅम्प सदर बझार येथील एका वकिलाच्या कार्यालयात अटक केली, तब्बल एक कोटी रुपये पोलिसांनी ताब्यात घेऊन, पंचाच्या समक्ष या मुद्देमालाचा पंचनामा केला. सातारा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे बाकीच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातील एका महिलेला मानसिक त्रास दिल्याचा आरोप राज्यसभेचे खासदार व शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता, सभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या प्रकरणाचे मोठे पडसाद उमटले होते, या प्रकरणी त्याचे वृत्तांत करणारे एका पत्रकाराला सुद्धा अटक झाली होती. सदर महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करत माध्यमांना मुलाखती सुद्धा दिल्या होत्या, मात्र शुक्रवारी सकाळी सातारा शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या महिलेला अटक केल्याने, साताऱ्यात एकच खळबळं उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने सदर महिलेला सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या महिलेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, हे प्रकरण राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने सातारा पोलिसांनी तातडीने तपास करत एका पत्रकारासह सदर महिलेला गजाआड केले आहे. तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता, हे प्रकरण मिटवण्यासाठी एक कोटी रुपये स्वीकारत असतानाच सातारा पोलिसांनी ही कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
No comments