फलटण येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात ; श्रीमंत रामराजे व समशेरसिंह यांच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२५ ने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले होते. सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची व विचारांची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. शोभा यात्रेत विविध चित्ररथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या आकर्षक प्रतीकृती व देखावे केल्यामुळे नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती. शोभायात्रेचा शुभारंभ विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
रविवार दि. १३ रोजी रात्री १२ वाजता बौद्ध बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनतर त्रिसरण पंचशील ग्रहण करून, रात्री १२ वाजता आंबेडकरी नूतन वर्षाचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विचार याबाबत मनोगते व्यक्त केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने यावर्षी करण्यात आलेल्या खर्चाचा अंदाजीत अहवाल जाहीर केला.
सोमवार दि. १४ रोजी सकाळी ८ वाजता फलटण येथे भिमज्योतीचे स्वागत पोलीस निरीक्षक हेमांतकुमार शहा यांनी केले, यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून भीमज्योत नेत असताना ठिकठिकाणी भीमज्योतीचे स्वागत करण्यात आले. भीम ज्योतीचे आगमन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे झाल्यानंतर तेथे आमदार सचिन पाटील व इतर मान्यवरांनी ज्योतीचे स्वागत केले.
![]() |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करताना मा. आ.दिपकराव चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (छाया - गंधवार्ता न्यूज) |
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आमदार सचिन पाटील, मा. आमदार दिपकराव चव्हाण, महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक तथा राष्ट्रीय काँग्रेस चे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके), सातारा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे,दत्तात्रय गुंजवटे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, प्रवीण आगवणे, किशोरसिंह नाईक निंबाळकर, राहुल निंबाळकर, अमोल सस्ते, संदीप चोरमले, दादासाहेब चोरमले, अनिल शिरतोडे, मेहबूब मेटकरी तसेचअ नेक मान्यवर व विविध सामाजिक संघटनांनी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले. फलटण शहर व तालुक्यातील विविध सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था वगैरे ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालुन अभिवादन केले.
![]() |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करताना आमदार सचिन पाटील (छाया - गंधवार्ता न्यूज) |
पंचशील रिक्षा ऑटो संघटनेच्या वतीने विठ्ठल मंदिर येठे अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. भीम नगर, मंगळवार पेठ फलटण येथील मित्र मंडळानेही अन्नदान व अभिवादन कार्यक्रमाच्या आयोजन केले होते. सोमवार पेठ फलटण, येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) फलटण आगार व कामगार संघटना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा ऑटो संघटनेच्यावतीने बसस्थानकावर मान्यवरांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकी दरम्यान क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव मंडळाच्या वतीने महात्मा फुले चौक येथे तर शुक्रवार पेठ येथे पप्पू भाई शेख मित्र मंडळ व मुस्लिम बांधवांच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले.
रविवार दि. १४ रोजी रात्री ८ वाजता पंचशील चौक, मंगळवार पेठ येथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा व चित्ररथासह शहर व तालुक्यातील ग्रामस्थांच्या सहभागाने आकर्षक विद्युत रोषणाई व सजावटीत प्रचंड मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी मिरवणूकीचा शुभारंभ विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सनी अहिवळे, सचिन अहिवळे, सुधीर अहिवळे, माजी नगरसेविका सौ. प्रगती कापसे, माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, किशोर तराळकर व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शोभायात्रा संपल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने पोलीस प्रशासन, ट्रक्टर चालक, झांजपथक, लाईट डेकोरेशन, साउंड सिस्टिम व जयंती महोत्सवास ज्यांची मदत झाली त्यासर्वांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानण्यात आले. यावेळी पोलीस यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
No comments