पादचाऱ्याला लुटणारे गुन्हेगार शिरवळ पोलिसांच्या ताब्यात
सातारा दि ११ ( प्रतिनिधी ) : शिरवळ (ता.खंडाळा) येथे पंढरपूर फाटा याठिकाणी रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी किरकोळ कारणातून कोयत्याने हल्ला करीत गंभीर जखमी केल्याप्रकरणी शिरवळ पोलीसांनी अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये ऋत्विक अंकुश माने (वय १९,रा.शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा) याला अटक केले तर एका अल्पवयीन मुलाला (१६ वर्षीय) शिरवळ पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीत पंढरपूर फाटा याठिकाणी असणाऱ्या दत्तनगर परिसरात नजीब खालीद पठाण (वय 49) हे राहतात. दरम्यान,नजीब पठाण हे पंढरपूर फाटा येथील आपल्या मुलाकडे रविवार दि.07 एप्रिल रोजी सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या ऋत्विक माने व अल्पवयीन मुलाने नजीब पठाण यांच्याशी किरकोळ कारणातून शाब्दिक वाद घालत ऋत्विक माने याने लोखंडी कोयता अचानकपणे नजीब पठाण यांच्या डोक्यात घालत गंभीर जखमी केले. यावेळी गंभीर जखमी झालेल्या नजीब पठाण यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती चिंताजनक बनल्याने पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक डॉ.वैशाली कडुकर,फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना दिल्या असता त्यानुसार शिरवळ पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना कामथे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सपकाळ, पोलीस अंमलदार तुषार कुंभार, सचिन वीर, प्रशांत धुमाळ, रमेश फरांदे, नितीन नलावडे, भाऊसाहेब दिघे, मंगेश मोझर यांच्या पथकाने ऋत्विक माने याला अटक करीत 16 वर्ष 6 महिने वय असलेल्या मुलाला ताब्यात घेतले.यावेळी हल्ल्यामध्ये वापरलेला कोयता व दुचाकी शिरवळ पोलीसांनी जप्त केली असून ऋत्विक माने याला खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने सोमवार दि.14 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर अल्पवयीन मुलाची सातारा येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना कामथे ह्या अधिक तपास करीत आहे.
No comments