Breaking News

विविध समाजाने एकमेकांकडे पाहताना दृष्टिकोन बदलावा - सचिन मोरे

Different societies should change their perspective when looking at each other - Sachin More

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.20 - आज आपण व्यवसाय करीत असताना आपला ग्राहक कोणत्या जातीचा धर्माचा आहे हे कधीही पाहत नाही. त्याचप्रमाणे विविध समाजातील लोकांनी एकमेकांकडे पाहताना जात धर्म विरहित मानवतेचा दृष्टिकोन ठेवून पहावे त्याच वेळेस खऱ्या अर्थाने महामानवांना अभिप्रेत असणारी समाज निर्मिती होईल असे मत धैर्य फाउंडेशनचे संस्थापक सचिन मोरे यांनी व्यक्त केले. फलटण तालुका सामाजिक समरसता आयामा अंतर्गत १४ एप्रिल महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती सर्व जाती धर्माच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उत्साहात साजरी झाली. त्यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते.

    यावेळी प्राचार्य वर्धमान अहिवळे, माजी नगरसेवक अनुप शहा, श्रीकांत सुर्वे सर , भरतेश राव सर व राव मॅडम, फलटण बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड बापूसाहेब सरक, ॲड प्रशांत निंबाळकर, ज्ञानेश्वर कोरडे, श्रीमती सुषमा काटे, संजय जाधव सर, सागर जाधव सर, मुख्याध्यापिका विश्रांती साबळे, अमोल कुमठेकर, ॲड. राजेंद्र ढेंबरे गणेश जाधव,ॲड.मीना सुर्वे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    पुढे बोलताना सचिन मोरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी विशिष्ट एका जाती धर्म करता काम न करता नवसमाज निर्मिती करण्यासाठी  समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी काम केले आहे. त्यामुळे अशा महामानवांना आज संपूर्ण जगाने स्वीकारले आहे. या महामानवांनी दिलेले संदेश आज आपण अंगीकृत करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

    प्राचार्य वर्धमान अहिवळे यांनी आपले विचार व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकांना समान हक्क दिल्याचे सांगून मजूर कायदे, महिलां विषयक कायदे, याची माहिती करुन दिली. प्रत्येक नागरिकाच्या जीवाची काळजी घेण्याची जबाबदारी देशाची असल्याचे उदाहरणार्थ स्पष्ट केले.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी सौ. प्राजक्ता अहिवळे व सौ अश्विनी अहिवळे यांनी त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदना घेतली.

    कार्यक्रमाची प्रास्ताविक व आभार ॲड. सौ.मीना सुर्वे मॅडम यांनी मानले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
 

No comments