Breaking News

ऐतिहासिक वारसा स्थळे जपावीत यासाठी हेरिटेज वॉक उपक्रम - श्रीमंत संजीवराजे

Heritage Walk initiative to preserve historical heritage sites - Shrimant Sanjeev Raje

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२ - हेरिटेज क्लबच्या माध्यमातून हेरिटेज वॉक आयोजित करणे व ऐतिहासिक वारसा स्थळांचे दुर्मिळ होत चाललेल्या गड किल्ल्यांचे व वास्तूंचे व त्यातील वस्तूंचे संगोपन करणे, त्यांचे महत्त्व अधोरेखित करणे, व त्या स्थळांचे महत्त्व पुढील पिढीला समजावून सांगणे यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतात. फलटण संस्थान 1240 पासून 1947 पर्यंत संस्थान म्हणून कार्य करीत आलेले आहे, त्यामध्ये फलटण संस्थानची स्वतंत्र प्रशासन व्यवस्था, स्वतंत्र चलन व्यवस्था, व  समाज व राष्ट्र उपयोगी कार्य केलेले होते, ते आजच्या तरुणांना समजणे महत्त्वाचे आहे.आज अनेक दुर्ग भ्रमंती करणारे लोक दुर्ग किल्ल्यांच्या संरक्षणासाठी, स्वच्छतेसाठी पुढाकार घेत असून, फलटण सारख्या ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या शहरांमध्ये व तालुक्यामध्ये असे अनेक ऐतिहासिक वारसा स्थळे आहेत. त्यांना भेटी दिल्या पाहिजेत, व आजच्या तरुणांना त्याचे महत्त्व सांगितले पाहिजे असे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

    फलटण एज्युकेशन सोसायटी व मुधोजी महाविद्यालयाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या हेरिटेज वॉक या विषयावरील कार्यक्रमाच्या स्थानावरून श्रीमंत संजीवराजे बोलत होते.  कार्यक्रमास हरिभाऊ देसाई महाविद्यालय पुणे येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा. गणेश राऊत हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

    प्रा. गणेश राऊत यांनी हेरिटेज वॉक म्हणजे ऐतिहासिक वारसा स्थळांचे प्रबोधन कसे करावे हे सांगत असताना, विविध समकालीन कलाकुसरी व कौशल्य यांच्या तुलनात्मक माहितीचा आढावा प्रेक्षकांसमोर ठेवला. ऐतिहासिक वारसा स्थळांचे महत्त्व सांगताना त्यांनी फलटणच्या मुधोजी मनमोहन राजवाडा, जबरेश्वर मंदिर, या वस्तूंचा समकालीन इतर शहरातील वास्तुंशी कसा संबंध आहे. व त्यातील कलाकुसरी अंतर्गत रचना सजावट याची अतिशय मार्मिक व विनोदी शैलीत मांडणी केली. हेरिटेज वॉक म्हणजे एखाद्या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची चळवळ असल्याची त्यांनी सांगितले. फलटण व पंचक्रोशी मध्ये असणाऱ्या विविध ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी हेरिटेज क्लबच्या माध्यमातून झाडे लावणे सुशोभीकरण करणे, पडझड होऊ न देणे असे कार्य हाती घ्यावे, तसेच त्याच वस्तूंचे पूर्वीचे स्थिती दर्शवणारे फोटोग्राफ्स व आत्ताचे फोटोग्राफ्स यांचे तुलनात्मक फोटो दर्शवणारे अल्बम तयार करावेत व लोकांना हा ऐतिहासिक स्थळांचा वारसा नव्याने समजून सांगावा, यासाठी हेरिटेज वॉक ही संकल्पना उपयुक्त असल्याचे सांगितले.

    सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते फलटण संस्थांचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत मालोजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रारंभी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. कदम  यांनी कार्यक्रमाचा उद्देश व अतिथींचा परिचय करून दिला.फलटण सारख्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या शहरांमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून हेरिटेज वॉक या संकल्पनेचा शुभारंभ होत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. फलटण संस्थान हे एक  अनेक शतकांपासून चालत आलेले प्रिन्सली स्टेट होते. त्यामुळे या संस्थांनचा अभ्यास नव्याने करणे, नवीन पिढीला आजूबाजूच्या ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व सांगणे, यासाठी हेरिटेज क्लब स्थापन होणार असल्याचे सुचित केले. या कार्यक्रमाची संकल्पना श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी मांडलेली होती. यापुढे अशा प्रकारचे उपक्रम झाले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    या कार्यक्रमासाठी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर आवर्जून उपस्थित होते. याशिवाय कार्यक्रमाला पुणे  गुजराती केळवनी मंडळाचे सहसचिव  दिलीपची झगड  व सदस्य  विजय देडिया, हेरिटेज वॉक पुण्याचे संयोजक उमेश पोटे व ज्योती राऊत  आणि फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य श्री शिरीष भोसले, नितीन गांधी, रणजीत निंबाळकर, प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, महाविद्यालयाचे आय क्यू एसी समन्वयक डॉ टी.पी शिंदे , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन डॉ. धुलगुडे, व प्रा गायत्री पवार यांनी केले. तर कार्यक्रमाचे संयोजन इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष कदम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अशोक शिंदे यांनी केले.

No comments