पहलगाम हल्ल्याचा राष्ट्रवादीकडून निषेध
सातारा (गंधवार्ता वृतसेवा) दि.२६ - जम्मू-काश्मीर येथील पहलगाव येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने शनिवारी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तानचा पुतळा पेटवून देण्यात आला.
आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवनाच्या समोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी आ. शिंदे म्हणाले, पहलगाम घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो, तसेच या हल्ल्यामध्ये ज्या निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहतो. पाकिस्तान पुरस्कृत हा भ्याड हल्ला होता. या देशात ज्या पध्दतीने पाकिस्तानने काश्मीरमध्ये अशांतता पसरवली आहे, भारत एकसंधतेने त्याचा सामना करत आहोत. पाकिस्तानला तेवढ्याच प्रखरतेने धडा शिकवला पाहिजे. काश्मीरमध्ये उन्हाळ्यात पर्यटकांची संख्या मोठी असते. पहलगाम परिसरात तर दाट जंगल आहे, गुप्तचर यंत्रणेने अधिक सजग राहायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. केंद्राने त्याबाबत कबुली दिली आहे. मात्र, आम्ही याप्रकरणात कोणतेही राजकारण न आणता, सरकारसोबत आहोत, असेही आ. शिंदे यांनी सांगितले.
या आंदोलनावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, दीपक पवार, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा समिंद्रा जाधव, जिल्हाध्यक्षा संजना जगदाळे, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अर्चना देशमुख, विजय बोबडे, अमोल पाटोळे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
No comments