आत्मदहनाच्या इशाराच्या विरोधात फलटण वकील संघ एकवटला ; 'त्या' प्रकरणात वकील हजर होते, हा घ्या पुरावा!
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.९ एप्रिल - ॲड. व्ही. एम. महाजन वकिलांच्या विरोधात किसन चंद्रकांत नरूटे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन, वकील हजर नसल्यामुळे माझी केस बरखास्त केली असे सांगून, आत्मदहनाचा इशारा दिल्याप्रकरणी, फलटण वकील संघाने बैठक घेऊन, या खटल्यात ॲड. व्ही. एम. महाजन हे हजर होते, मात्र न्यायालयाने खटल्याचा निकाल, हा खटल्यातील सत्यता तपासत, मेरिट पॉईंटवर दिला असून, महाजन वकील यांचा दोष नसल्याचे निवेदन, प्रांताअधिकारी व पोलीस स्टेशन येथे देऊन, त्यासोबतच वकील कोर्टात हजर असल्याचा पुरावा देखील सादर केला आहे. दरम्यान किसन चंद्रकांत नरूटे यांनी माझी खोटी बदनामी केली असून, त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे ॲड. व्ही. एम. महाजन यांनी सांगितले.
ॲड. विठ्ठल मुगुटराव महाजन व फलटण वकील संघ, फलटण यांच्या वतीने प्रांताधिकारी व पोलीस स्टेशन यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, फलटण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील कोर्ट नं.६ या न्यायालयामध्ये श्री. किसन चंद्रकांत नरुटे यांनी फौजदारी किरकोळ अर्ज ३४१/२०२२ हा दाखल केलेला होता. सदरील मुळ अर्ज दाखल करतेवेळी दुसऱ्या वकीलांनी दाखल केलेला होता. त्यानंतर पक्षकारांनी वेळोवेळी कोर्टाचे कामकाज पाहणेकरीता वकीलांची नेमणूक केलेली होती. त्यानंतर सदरील कामकाज ॲड. व्ही. एम. महाजन यांच्याकडे आलेले होते. सदरील कोर्टातील कामकाज मी माझे व्यवसायीक कर्तव्य प्रामाणिकपणे केलेले असून, त्यामध्ये दि.०३/०४/२०२५ रोजी मी व वरील तक्रारदार हजर असताना कोर्टाने गुणांवगुणावर न्यायनिर्णय दिलेला आहे.
श्री. किसन चंद्रकांत नरुटे यांनी सदरील वस्तुस्थिती लपवून ठेवून, त्यांचे वकील मे. कोर्टात हजर नसलेने त्यांचा अर्ज मे. कोर्टाने काढून टाकला अशी खोटी कथने प्रसारमाध्यमांमध्ये करून माझी बदनामी केलेली आहे. तसेच वकील या नात्याने सदरील अर्जाच्या कामकाजामध्ये माझी काहीएक चुक नसताना, माझ्या बद्दल खोटी कथने प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध केलेले असून, वकिल हजर न राहिल्याबाबत आत्मदहनाचा इशारा दिलेला असून, सदरील बातमी प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध केलेली आहे. त्याचप्रमाणे श्री. किसन चंद्रकांत नरुटे यांनी मा. उच्च न्यायालय सोो, मुंबई, मा. सुप्रिम कोर्ट सोो, दिल्ली यांच्याकडे खोट्या स्वरुपाचे बदनामी कारक अर्ज केलेले आहेत.
सदरील प्रकाराबाबत मी सदरील व्यक्तीशी संपर्क साधला असता, त्याने माझ्याकडे हे प्रकरण थांबवायचे असेल तर जास्त रक्कमेची मागणी करून ब्लॅकमेल करणेस सुरवात केलेली आहे. तरी श्री. किसन चंद्रकांत नरुटे यांनी वकील हजर न राहील्याबाबत आत्मदहनाचा इशारा दिलेल्या निवेदनाची चौकशी होवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणेत यावी. ही विनंती.
No comments