बारा तासानंतरही सौरभ शर्मा चा मृतदेह सापडेना ; बचाव पथकाचे स्पीड बोटी मधून अथक प्रयत्न, अद्याप यश नाही
सातारा दिनांक 23 प्रतिनिधी - संगम माहुली येथील कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमांमध्ये खोल डोहात बुडालेल्या सौरभ शर्माचा मृतदेह तब्बल 12 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अद्याप सापडलेला नाही .रेस्क्यू टीमने स्पीड बोट वापरून तसेच काही पट्टीचे पोहणारे कार्यकर्ते पाण्यात उतरूनही सौरभ चा मृतदेह आढळून आला नाही .त्यामुळे साडेसहाच्या नंतर हा शोध पुन्हा एकदा थांबवण्यात आला.
प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांच्या मुंबई फिल्म च्या आगामी राजा शिवछत्रपती चित्रपटाच्या महत्त्वपूर्ण भागांचे चित्रीकरण संगम माहुली परिसरात सुरू आहे . मंगळवारी चित्रपटाचे शेड्युल संपल्यानंतर सौरभ आणि त्याचे मित्र संगमावरील पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरले होते त्यानंतर खोल पाण्याच्या डोहात सौरभ शर्मा बुडाल्याने त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला मात्र त्यानंतर तो आढळून आला नाही .अभिनेता रितेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली असता शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमचे दहा सदस्य तसेच गावातील काही पट्टीचे पोहणारे यांनी एकत्रितरित्या रात्री उशिरा पर्यंत शोध मोहीम राबवली परंतु त्याला यश आले नाही.
बुधवारी सकाळी पुन्हा सकाळी साडेदहा वाजल्यापासून तब्बल सहा तास पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली. संगमातील वेण्णा व कृष्णा नदीच्या संगमापासून पुलाच्या दिशेने स्पीड बोटीने दहा ते पंधरा वेळा घिरट्या मारून तसेच खोल डोहामध्ये पाण्याचा फुगवटा टाळून सौरभ ला शोधण्याचा अथक प्रयत्न झाला त्यामुळे बुधवारी मुंबई फिल्म च्या प्रोडक्शन युनिटचे कोणतेही शूटिंग होऊ शकले नाही .स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांनी या दुर्घटनेला दुजोरा देत झाल्या प्रकाराबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे काशी विश्वेश्वर मंदिरासमोरील घाट परिसरामध्येही त्याचा कसून शोध घेण्यात आला मात्र पाण्याच्या खाली गाळ मोठ्या प्रमाणावर असल्याने मदत कार्यामध्ये अडचणी येत होत्या .सातारा शहर पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी जाऊन या सर्व प्रकाराची माहिती घेतली दिवसभर सौरभच्या पार्थिवाचा शोध सुरू होता . सायंकाळी साडेसहाच्या नंतर प्रकाश कमी झाल्याने ही शोध मोहीम पुन्हा एकदा थांबवण्यात आली.
No comments