शरयु ॲग्रोकडून घाडगेवाडी येथे 'एआय तंत्रज्ञान - भविष्यातील ऊस शेती' कार्यशाळेचे आयोजन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२१ - शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे घेतल्या जाणाऱ्या ऊस उत्पादन वाढीची सविस्तर माहिती व्हावी या उद्देशाने कार्यकारी संचालक युगेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शरयु ॲग्रो इंडस्ट्रीज लि. व अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या विद्यमाने बुधवार दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता प्रसाद मंगल कार्यालय, घाडगेवाडी ता.फलटण येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेत ऊस उत्पादन आणि साखर उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन, AI तंत्रज्ञान - भविष्यातील ऊस शेती, ए.आय. संबंधी सेंसर, वेदर स्टेशन इत्यादींची प्रात्यक्षिके दाखवण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शंका आणि तंत्रज्ञानाबाबतच्या प्रश्नांबाबत तज्ञांकडून सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
बदलत्या वातावरणाचा परिणाम ऊस पिकावर होत आहे, त्यामुळे कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.
कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील मृदा शास्त्र विशेषज्ञ डॉ. विवेक भोईटे यांचे मार्गदर्शन होणार आहे. परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांनी बहुसंख्येने कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन शरयु कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.
No comments