जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खुंटे येथील दोघांना ३ वर्ष कारावास
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२३ एप्रिल - जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यात दोघांना दोषी ठरवून, त्यांना प्रत्येकी तीन वर्ष कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, दंड न भरलेस तीन महिने साधी कैद अशी शिक्षा फलटण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली आहे. प्रमोद विलास माने व विठ्ठल विलास माने राहणार खुंटे ता. फलटण अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक 15/01/2015 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास खुंटे तालुका फलटण गावी प्रमोद विलास माने यांचे घरासमोर अंगणात विठ्ठल विलास माने यांनी भाऊ अनंतराव यास इथे गाडी लावू नको, हे घर आमचे आहे, असे म्हणून त्याच्या हातातील सत्तूराने डोक्यावर, गालावर, हातावर वार करून त्यास गंभीर जखमी केले, तसेच प्रमोद विलास माने याने त्याच्या हातातील काठीने डावे हातावर व पाठीवर मारहाण करून जखमी केले व सुषमा विलास माने व माया विलास माने यांनी पत्नी वैशालीला हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली असल्याची फिर्याद दयानंद बाबुराव माने वय 50 राहणार कोणते तालुका फलटण यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली होती.
फलटण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश चतुर साहेब यांनी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून, सादर केलेल्या साक्षी, पुराव्याचे अवलोकन करून, आरोपी प्रमोद विलास माने व विठ्ठल विलास माने या दोघांना आयपीसी कलम 307,326,324,504,506,34 अनुसार दोषी ठरवले. दोघांना प्रत्येकी तीन वर्ष कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, दंड न भरलेस तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
या कामी सरकारी पक्षाची बाजू ॲड. मिलिंद ओक यांनी मांडली, तर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सौ. एस. एस .धस मॅडम फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी केला. कोर्ट पैरवी साधना कदम यांनी कामात साह्य केले.
No comments